दोन विविध अपघातात वरकटणे व केम येथील दोन व्यक्तींचा मृत्यू
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यात मोटारसायकल व चारचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात करमाळा तालुक्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघातानंतर चारचाकीचे वाहन चालक घटनास्थळाहुन पळून गेले.
पहिला अपघात १२ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकाराच्या सुमारास जिंती (ता. करमाळा) येथिल जाधववस्ती जवळ छोटा हत्ती वाहन व मोटारसायकल यांच्यात झाला. यामध्ये बाळासाहेब दामोदर कदम (वय 52 वर्षे) रा. वरकटणे (ता. करमाळा) हे मोटारसायकल वरून जिंतीकडुन भिगवण कडे जात होते. ते या अपघातात गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागुन रक्तश्राव झाला होता. यानंतर छोटा हत्तीचा चालक तेथुन पळुन गेला. त्यानंतर स्थानिकांनी कदम यांना करमाळा येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आणले परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.या घटनेनंतर मयत बाळासाहेब कदम यांचे बंधू कांतीलाल कदम यांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये छोटा हत्ती वाहन क्र एम एच 12 आर एन 9460 याच्या चालकाच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, छोटा हत्ती वाहन क्र एम एच 12 आर एन 9460 अज्ञात चालकाने रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात हयगयीने निष्काळजीपणे व बेदकारपणे चालवुन भाऊ बाळासाहेब याचे मोटार सायकलला समोरून धडक देवुन त्यास गंभीर जखमी करून त्याचे मरणास कारणीभुत ठरला आहे. तसेच जखमी भावास मदत न करता तेथुन ड्रायव्हर पळुन गेला.
दुसरा अपघात दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सायं. ७ च्या सुमारास कंदर (ता.करमाळा) येथील हॉटेल ईश्वरी जवळ टमटम व मोटारसायकल यांच्यात झाला. यात केम (ता.करमाळा) येथील सागर जयसिंग गुटाळ (वय 32 वर्षे) यांचे अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारा पूर्वीच निधन झाले. मयत सागर गुटाळ हे टेंभुर्णी येथून त्यांचे काम आटपून राहते गावी केम येथे निघाले होते. यावेळी कंदर गावाकडून टेंभुर्णीच्या दिशेने जाणाऱ्या टमटमशी गुटाळ यांची जोरदार धडक झाली होती.
मयत सागर गुटाळ यांचे बंधू अमोल गुटाळ यांनी
टमटम चालक दिपक कसबे रा. टेंभुर्णी ता. माढा याच्या विरुद्ध करमाळा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे.
त्यात म्हटले आहे की, टमटम चालक दिपक कसबे याने आपल्या ताब्यातील वाहन हे हयगईने, अविचाराने निष्काळजीपणे,भरधाव वेगात, रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवून समोरून भाऊ सागर याच्या मोटारसायकलीस जोराची धडक देऊन भाऊ सागर यास गंभीर जखमी करून त्याचे मरणास कारणीभूत झालेला आहे. तसेच अपघातानंतर त्याने भाऊ सागर गुटाळ यास दवाखान्यात दाखल न करता अपघात स्थळाहुन पळून गेला.