विवाहितेची छळ सहन न झाल्याने गळफास घेत आत्महत्या

करमाळा,ता.19: हुंडा व सततच्या मानसिक-शारीरिक छळाला त्रस्त झालेल्या अनिता उर्फ राधिका धनंजय वाघचौरे हिने 11ऑक्टोंबरच्या पहाटे गळफास घेऊन आपले जीवन संपवले. याबाबत तिचे वडील धनंजय गुलाब वाघचौरे (वय 43, रा. रोपळे (क), ता. माढा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले, की अनिता हिचे लग्न दि. 27 एप्रिल 2022 रोजी कमलाई लॉन्स (करमाळा) येथे विशाल मारूती भोसले (रा. पांडे, ता. करमाळा) याच्याशी झाले. लग्नात भांडी, कपडे, फर्निचर दिल्यानंतरही पती व सासरचे मंडळींनी TV, फ्रिज, आणि सोन्याची अंगठी अशा मागण्या सुरू ठेवल्या.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तिचे पती विशाल, सासू अनिता भोसले, सासरे मारूती भोसले व दिर रोहित हे मिळून तिला “गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आण” म्हणत तसेच “तु दिसायला चांगली नाहीस, आमच्या घरात शोभत नाहीस. तुला घरकाम जमत नाही” असे म्हणत सतत शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ करीत होते. तरीही नांदत होती जून 2025 मध्ये अनितेला मुलगी झाली. मुलगा न झाल्यामुळे सासरकडून छळ सुरू केला.” माहेरी जा” अशा धमक्या व अपमान करण्यात येत होता.

दि. 11 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.40 वाजता, अनिताच्या सासऱ्यांनी फोनवरून “राधाला दवाखान्यात नेले” अशी माहिती दिली. कुटुंबीय तातडीने करमाळा ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असता अनिताने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समजले.
पोस्टमार्टम करून प्रेत हस्तांतरित करण्यात आले असून या मृत्यूस जबाबदार असलेल्या सासरच्या सर्व आरोपींवर हुंडा प्रतिबंधक कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 
                       
                      