कौटुंबिक वादातून मेव्हण्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

करमाळा(दि.८): केम येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या मेव्हण्यावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मृत व्यक्तीच्या वडिलांनी भगवान शामराव गाडे (वय ७०) यांनी करमाळा पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, विजय भगवान गाडे (वय 31, रा. केम, ता. करमाळा) यांचे लग्न सन 2021 मध्ये रोहिणी अशोक धवस हिच्याशी झाले होते. काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वैवाहिक वाद सुरू होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणानंतर रोहिणी माहेरी हिंगोली येथे निघून गेली होती.

दहा दिवसांपूर्वी रोहिणी तिच्या आई-वडिलांसह व भाऊ राहुलसह केम येथे विटभट्टीवर मजुरीसाठी आली होती. दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजय आपल्या पत्नीला भेटण्यासाठी त्या विटभट्टीवर गेला. तेथे त्याचा मेव्हणा राहुल धवस याने ‘तू माझ्या बहिणीला भेटायला का आला? मी तुला तिच्यासोबत भेटू देणार नाही’ असे म्हणत विजयला शिवीगाळ केली व हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जवळच पडलेल्या कोणत्यातरी हत्याराने पोटावर वार केला.

या घटनेत विजय गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी केम, करमाळा व नंतर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.45 वाजता त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम अहवालानुसार पोटात झालेल्या मारहाणीमुळे आतून संसर्ग होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेनंतर करमाळा पोलिस ठाण्यात राहुल अशोक धवस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे हे करीत आहेत.


