करमाळा येथील कन्हैया परदेशी यांचे अपघाती निधन -

करमाळा येथील कन्हैया परदेशी यांचे अपघाती निधन

0

करमाळा(दि.९) : करमाळा येथील हॉटेल व्यावसायिक कन्हैया संजय परदेशी (वय ३८) यांचे गुरुवारी, दिनांक ६ नोव्हेंबर रोजी रात्री अपघाती निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कन्हैया परदेशी हे आवाटी येथे भागीदारीत हॉटेल व्यवसाय चालवत होते. नेहमीप्रमाणे ते दर आठ-दहा दिवसांनी मोटरसायकलने करमाळ्याला आपल्या घरी येत असत. गुरुवारी रात्री ते हॉटेलवरून करमाळ्याकडे येत असताना फिसरे गावाजवळ सुमारे ११.१५ च्या सुमारास उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्त्यावर उभा होता. अंधारात ट्रॉली दिसली नसल्याने त्यांच्या मोटरसायकलची ट्रॉलीला जोरदार धडक बसली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामुळे करमाळा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. ते करमाळ्यातील हॉटेल व्यावसायिक संजय परदेशी यांचे चिरंजीव होते तसेच हॉटेल भवानी जंक्शनचे अक्षय परदेशी व दत्ता परदेशी यांचे मोठे बंधू होते. कन्हैया परदेशी यांच्या अकस्मात निधनाने करमाळा व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परदेशी यांचा 15 नोव्हेंबर रोजी संगोबा येथे ८ वाजता दशक्रिया विधी होणार आहे तर 18 नोव्हेंबरला राहत्या घरी खडकपुरा,करमाळा येथे तेराव्याचा विधी होणार असल्याची माहिती परदेशी परिवाराकडून देण्यात आली.

ऊस वाहतूकीचे अपघात टाळण्यासाठी: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी रात्रीच्या वेळी ट्रॉलीवर परावर्तक टेप, लाल दिवे व रिफ्लेक्टर लावणे अत्यावश्यक आहे. ट्रॉली रस्त्याच्या कडेला नीट उभी करावी व अति भर न करता सुरक्षितपणे वाहन चालवावे. तसेच इतर वाहनचालकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जवळून जाताना वेग कमी ठेवावा, अंधारात किंवा धुक्यात योग्य अंतर राखावे आणि ओव्हरटेक करताना विशेष काळजी घ्यावी. थोडीशी खबरदारी घेतल्यास अशा अपघातांना आळा बसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!