जातेगावमधील गणेश वारे यांचे अपघाती निधन
करमाळा(दि.५) : जातेगाव (ता.करमाळा) येथील गणेश दादासाहेब वारे (वय ४१) यांचे अपघाती निधन झाले आहे. ३ फेब्रुवारीला सकाळी १०:१५ च्या सुमारास करमाळा -अहिल्यानगर रोडवर मांगी शिवाराजवळ मोटारसायकल व पिकअप यामध्ये हा अपघात घडला होता. यासंदर्भात गणेश वारे यांचे चुलत बंधू संतोष वारे यांनी करमाळा पोलिसांमध्ये फिर्याद दिलेली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश वारे, हे त्यांच्या जवळील बजाज डिस्कवर या मोटार सायकलवरून (क्रमांक MH 45 AU 0724) करमाळाकडून जातेगावकडे हायवेने जात असताना मांगी शिवाराजवळ अहिल्यानगरकडुन करमाळाकडे येणारी महिंद्रा पिकअपने (गाडी क्र. GJ 15 AV 5975) समोरील दुसऱ्या गाडीस ओव्हरटेक करताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलवरील गणेश वारे यांना जोराची धडक दिली. या धडकेमध्ये गणेश वारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. सदरील पिकअप गाडीचा चालक वैभव रामा तरंगे, वय 21 वर्षे, धंदा चालक, रा. तरंगे वस्ती, शेंद्री, ता. बार्शी, जि. सोलापूर याच्या विरोधात करमाळा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.