मित्राच्या लग्नाला आला आणि प्राण गमावून बसला.. - Saptahik Sandesh

मित्राच्या लग्नाला आला आणि प्राण गमावून बसला..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : मित्राच्या लग्नाला आला आणि अपघातात प्राण गमावून बसला.. अशी दुर्दैवी घटना सालसे (ता. करमाळा) येथे २६ नोव्हेंबरला रात्री घडली आहे. या प्रकरणी पुणेहून झिरो नंबरने गुन्हा दाखल होऊन करमाळा पोलीसाकडे चौकशीसाठी आला आहे.

यात गजानन दशरथ जाधव (रा. इंदिरानगर, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २६ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता मी व माझा मित्र नवनाथ लक्ष्मण वाघमारे (वय२६, रा. गुरूदास कॉलनी, लोहगाव, पुणे) असे आम्ही दोघे आमचा मित्र सुशांत हराळे याचे बारलोणी (ता. माढा) येथे लग्न असल्याने २६ नोव्हेंबरला आलो होतो. २६ नोव्हेंबरला हळदीचा कार्यक्रम रात्री नऊ वाजता संपला.

त्यानंतर मी व माझा मित्र नवनाथ वाघमारे मोटारसायकल क्र. एमएच १६ डीएफ ५१७७ वरून पांडे येथील माझे नातेवाईकाकडे निघालो. नवनाथ वाघमारे हा मोटारसायकल चालवत होता. बारलोणीवरून सालसे गावाच्या पुढे आल्यानंतर नवनाथ वाघमारे याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला व त्याने समोर जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यात अपघात झाला, त्यामध्ये माझा डावा हात फॅक्चर झाला, डोक्याला मार लागला तर नवनाथ यास नाकाला, तोंडाला व डोक्याला जखमा झाल्या. त्यात तो बेशुध्द पडला. मी माझे नातेवाईक माणिक भोसले (रा. पांडे) यांना हकीकत कळवली. ते तात्काळ तेथे अॅम्बुलन्स घेऊन आले व त्यांनी करमाळा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी नवनाथ वाघमारे हा मरण पावल्याचे सांगितले. मला त्यानंतर ससूण हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले. या प्रकरणी पोलीसांनी व मयताच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!