कंदर येथील शंकरराव भांगे यांचे निधन

करमाळा(दि.२५): कंदर येथील शंकरराव राजाराम भांगे यांचे आज (दि.२५) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी कंदर येथील त्यांच्या शेतात (भांगे वस्ती) पार पडला. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच भास्कर भांगे यांचे ते वडील होते.
माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे ते अत्यंत विश्वासू व निष्ठावान सहकारी म्हणून ते परिचित होते. करमाळा येथील विद्या विकास मंडळ, करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी आदी शैक्षणिक संस्थांवर विश्वस्त पदी काम त्यांनी केले होते. याच अनुभवावर त्यांनी कंदर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी अनेक वर्षे कामकाज पाहिले आहे. त्यांच्या निधनानंतर सामाजिक, राजकिय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात शंकरराव भांगे यांचे स्थान पितृतुल्य मार्गदर्शकाचे होते. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या वेळी मार्केट कमिटी निवडणूक व विधानसभा निवडणूक प्रसंगी भांगे मालक यांनी मला अत्यंत मोलाची मदत केली. ईश्वर मृत आत्म्यास चिरशांती देवो व सद्गती लाभो हीच प्रार्थना, भांगे कुटुंबीयांचे दुःखात मी सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो.
● जयवंतराव जगताप, माजी आमदार करमाळा





