करमाळ्यात तिरंगी संघर्ष : सत्ता, संघटन आणि बदल यांची थेट लढत (अग्रलेख) -

करमाळ्यात तिरंगी संघर्ष : सत्ता, संघटन आणि बदल यांची थेट लढत (अग्रलेख)

0

करमाळा नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच संपूर्ण निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीला पक्षीय रंग असलातरी, प्रत्यक्षात लढत भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शहर विकास आघाडी अशा तीन मुख्य प्रवाहात होताना दिसत आहे. गेल्या तीन दशकांपासून नगरपालिकेवर सलग सत्ता राखणाऱ्या जगताप गटाकडे निवडणूक व्यवस्थापनाचा भक्कम अनुभव आहे.

सन २०१६ मध्ये त्यांनी वैभवराजे जगताप यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी त्यांचे सोबत त्यांचे पारंपारिक स्पर्धक बागल गट होता. जगताप गटाने यावेळी नंदिनीदेवी जयवंतराव जगताप यांना उमेदवारी देवून विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. जगताप गटाचे समर्थन, बाजार समितीची सत्ता, व्यापाऱ्यांचे पाठबळ, शिक्षण संस्थेचे समर्थन या कारणांमुळे जगताप गटाचे पारडे पुन्हा एकदा जड दिसत आहे.

दुसऱ्या बाजुला भाजपने प्रथमच संघटीत पध्दतीने उमेदवार उभे केले आहेत. करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांची नागरीक संघटना, भाजपाचा जुना गट म्हणून ओळखला जाणारा गणेश चिवटे यांचा गट आणि बागल गट या तीन वेगवेगळ्या प्रभावी गटांना एकत्र आणून भाजपने मजबुत पॅनल उभे केले आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी सोबत भाजपची तडजोड होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण भाजपने स्वतंत्र उमेदवार देत सर्व २० प्रभागात आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी आठ ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचे ठरवले असून नगराध्यक्ष पदाला भाजपाला पाठींबा दिला आहे. करमाळा अर्बन बँक, देवी विद्यालय, नवभारत इंग्लीश स्कुल, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कमलादेवी कन्या विद्यालय ही भाजपाची बलस्थाने आहेत.

याबरोबरच माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पाठबळही त्यांना आहे. याशिवाय सुनिता देवी यांची उमेदवारी महत्वाची आहे. त्या स्वतः पदवीधर असून, एक संस्थाचालक असल्याने प्रशासनाचा अनुभव असलेल्या त्या स्वयंभू नेत्या आहेत. त्याचा फायदा भाजपाला होत आहे.

या दोन तुल्यबळ लढतीला तितक्याच समर्थपणे लढा देण्याचे धोरण आखून शहर विकास आघाडीकडून मोहिनी संजय सावंत व २० ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विविध नेत्यांसमवेत काम करणारा सावंत गट यावेळी पूर्णपणे स्वतंत्र पर्याय म्हणून पुढे आलेला आहे. शहर विकास आघाडी या नावाने त्यांनी स्वतंत्र नेतृत्व उभे केले आहे. शहरातील त्यांचा असलेला मोठा गट, नातलगांचे पाठबळ, हमाल पंचायतचे समर्थन, शिवसेना ठाकरे गटाचे पाठबळ, त्याचबरोबर शिवसेना (शिंदे) व भाजपाकडून नाराज झालेले कार्यकर्ते आणि तटस्थ मतदारांकडून त्यांना मिळणारा पाठींबा याबाबी त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.

शहराची झालेली दुरावस्था, विस्कळीत पाणीपुरवठा, खराब रस्ते, स्वच्छतेचा अभाव आणि निधी वापरातील अनियमितता. या सर्व मुद्यांवर शहर विकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर मोठे आक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी आणि चुरशीची होणार. अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासाठी भाजपाला समर्थन जाहीर केले असलेतरी आठ प्रभागात आपले उमेदवार देऊन ते स्वतंत्रपणे लढा देत आहेत. त्यांची भुमिका आघाडीपेक्षा स्वतःला  आजमावण्याची दिसत आहे. जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तिथे तिथे धक्कादायक निकाल लागणार यात शंका नाही. या निवडणुकीत अपक्षांचे अस्तित्व नगण्य असून कुठलाही मोठा घोळ घालण्याची क्षमता त्यांच्या वाट्याला आलेली नाही. त्यामुळे मुख्य संघर्ष केवळ तिघांच्याच गटामध्ये थेट होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. थोडक्यात पाहिले तर ही लढत सत्ताधारी विरुध्द सत्ताधारी होत असतानाच त्यांना शहर विकास आघाडीचे मोठे आव्हान आहे.

या पक्षीय निवडणुकीत ज्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार नाहीत. याचे कारण सर्वांनाच ज्ञात आहे, ते म्हणजे तालुका पातळीवरील युती हे आहे. विशेष म्हणजे जगताप गट व सावंत गट या दोन्ही गटाबरोबर आमदार नारायण पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे संबंध चांगले आहेत. वा निवडणुकीत ते दोघे कोणती भुमिका घेणार यावर सुध्दा निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.

जगताप गटाकडे अनुभव, जुना गट आणि शिवसेना पक्ष, चिवटे बंधूचे पाठबळ. भाजपाकडे पहिल्यांदा मिळालेली व्यापक संघटन रचना, अनुभव संपन्न गटांची युती, विविध संस्थांचे पाठबळ व स्वयंभू उमेदवार तर शहर विकास आघाडीकडे नवा बदल देण्याची क्षमता, | ठाकरे गटाचे पाठबळ, विविध संस्थांचे समर्थन आणि नाराज मतदारांची साथ. त्यामुळे या तिन्ही गटांची ताकद समान असल्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने झुकतो याचे अंदाज बांधणे कठीण झाले आहे. परंतू इतके नक्की आहे, की करमाळा शहरवासियांना व्यवस्थेत बदल हवा, की अनुभवी हातातच पुन्हा सत्ता द्यायची की नव्या तिसऱ्या पर्यायाला संधी द्यायची याचा निर्णय वा निवडणुकीत होणार आहे. करमाळ्याची ही तिरंगी लढत आगामी राजकीय वातावरणालाही नवे वळण देणारी ठरेल; यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!