आज बारावीचा निकाल होणार प्रसिद्ध - निकाल पाहणे, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन श्रेणीसुधार याविषयीची संपूर्ण माहिती पहा - Saptahik Sandesh

आज बारावीचा निकाल होणार प्रसिद्ध – निकाल पाहणे, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन श्रेणीसुधार याविषयीची संपूर्ण माहिती पहा

प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा (दि.२५) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर आज दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

राज्य मंडळाने जे परिपत्रक प्रसारित केले आहे त्यात सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे.

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mhhsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते सोमवार, दिनांक ०५/०६/२०२३ पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक २६/०५/२०२३ ते बुधवार, दिनांक १४/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card/ UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२३ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २९/०५/२०२३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

५) फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सोमवार दि. ०५/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!