राजस्थानात कार्यरत असलेल्या जवानाकडून मारकड वस्ती शाळेतील विद्यार्थिनींना रक्षा बंधनाची अनोखी भेट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – देशाच्या सेवेत कार्यरत असलेल्या जवानांबद्दल प्रत्येकाच्या मनात कृतज्ञे तिची भावना असते. अशाच या भावनेतून रक्षा बंधनानिमित्ताने करमाळा तालुक्यातील मारकड वस्ती (केंद्र चिखलठाण) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी देश सेवेत कार्यरत असलेल्या विविध जवानांना पोस्टाने राख्या पाठविल्या होत्या. या जवानांपैकी शेलगाव (ता.करमाळा) येथील जवान दत्तात्रय महामुनी यांनी राख्या मिळताच या विद्यार्थिनींना काहीतरी भेट देण्याचे ठरविले व त्यातून त्यांनी शाळेतुन राखी पाठविणाऱ्या १६ विद्यार्थिनींना शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप यांच्या माध्यमातून दप्तर भेट दिले आहे.
श्री.महामुनी हे सध्या राजस्थान येथे कार्यरत आहेत.महामुनी यांना पोस्टाने राख्या मिळताच त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थिनींना काहीतरी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. श्री. जगताप यांनी विद्यार्थिनींची गरज ओळखून दप्तर देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे श्री.महामुनी यांनी १६ विद्यार्थिनींना काल (दि.५) रोजी शाळेचे मुख्याध्यापक जगताप यांच्या माध्यमातून दप्तर भेट दिले आहे.
यावेळी जगताप यांनी देशासाठी कार्य करणाऱ्या सैनिकांविषयी माहिती दिली. यावेळी गणेश मारकड, रोहित गव्हाणे, शिवाजी साळुंखे, संदीप चोबे, रोहित मारकड प्रताप चौबे आदींजन उपस्थित होते. श्रीमती स्वाती पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.