जिल्हा परिषद शाळेचा उज्ज्वल चेहरा – गोयेगावची शाळा..

0

शाळा असावी शाळेसारखी नसोत वेगळे ढंग
ओठावरती हसू असावे अंगावरती रंग….
किलबिलताना, बागडताना पुस्तकांशी मैत्री व्हावी
माती मधुनी अंकुरताना मने अवघी गंधित व्हावी…..
शाळा असावी शाळेसारखी नकोत नुसत्या भिंती
आठवणींनी गहिवर यावा बसू जेव्हा एकांती…

खरंच शाळा ही अशी असावी. त्या ठिकाणी रमणे, फुलणे असावे.. गवतफुलांसारखे झुलणे असावे.. मग अशी शाळा मुलांच्या रोमरोमात भिनली जाते आणि तिथली अक्षरे त्यांच्या श्वासात दरवळली जातात….



ही अशी शाळा मी पाहिली ती गोयेगाव या अडवळणाच्या गावी.. करमाळ्यापासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असणारे हे उजनीच्या काठावरचे गाव… तिथून मावळतीचा सूर्य पाण्यात बुडताना पहावा… तिथल्या पाण्यावर पहाटेचे धुके आरस्पानी चमकते. निळे क्षितिज संथ पाण्यात झुकते… ते छोटसं विस्थापित गाव म्हणजे गोयेगाव..

त्याच गोयेगावातील अर्ध्या पाऊण एकरातील जिल्हा परिषद शाळेचा परिसर आपल्याला मंत्रमुग्ध करतो.. शाळेचा परिसर झाडा फुलांनी गजबजलेला आहे. विटांच्या बांधणीचे पूर्ण कंपाऊंड आणि त्याच्या बाजूने उंच उंच पसरलेली झाडे… उजव्या बाजूला एका ओळीत एखाद्या सैनिकांप्रमाणे ताठ उभे असणारे उंच बॉटल ट्रीज….. संध्याकाळच्या छाया झाडांच्या माथ्यावर पसरल्यावर त्यावर बसण्यासाठी गर्दी करणारे असंख्य पाणबगळे आणि त्यांच्या गोंगाटाने त्या छोट्याशा गावाची ढवळणारी शांतता… हे सारं अनुभवल्यावर आपण एका वेगळ्या विश्वात जातो……

मला वाटते ही शाळा शांती निकेतन पेक्षा काहीच कमी नाही.. शाळेच्या पुढ्यात चौकोनी विस्तीर्ण स्टेज आणि स्टेजच्या पायथ्याला फुललेले गुलाबांचे ताटवे मन मोहन घेतात…. रंगीबेरंगी जरबेरी तिथे उमलून आलेली दिसून आली….. मुले आणि फुले ज्या शाळेत असतात ना, ती शाळा खऱ्या अर्थाने एक ज्ञान केंद्र असते. ती शाळा परिपूर्णतेने तिथे शिकणाऱ्या मुलांना निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते शिकवते.. तेच नाते या मुलांना भविष्यात जगाच्या अथांग पसाऱ्यात सक्षमपणे जगण्याला मदत करते… हे सारे त्या गोयेगावच्या शाळेत दिसून आले..

सारा परिसर तांबड्या स्वच्छ मातीचा आहे.. याच तांबड्या मातीच्या स्पर्शाने इथले विद्यार्थी घडलेत. कबड्डी, खो-खो यासारख्या खेळात जिल्हास्तरावर चमकलेत. ही गोष्ट त्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे..

आजच्या युगात जाहिरातींच्या भाकड रूपावर भाळून स्वतःला शिक्षित म्हणवणारे पालक जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवताना दिसतात. त्यांनी स्वतःची एक ठाम समजूत करून घेतलीय ती म्हणजे खाजगी, मोठी फी असणाऱ्या शाळेत पाल्याला घातले की तो कलेक्टरच होणार…. अशा अडाणी, समाज निरक्षर पालकांसाठी ही शाळा एक सुंदर वास्तवाचे जळजळीत उदाहरण ठरावे…

इथे शिकणारी मुले चांगले लिहितात. इथल्या बोलक्या भिंतीप्रमाणे बोलतात.. स्वच्छ रंगीत वर्ग खोल्यांप्रमाणे चमकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथल्या झाडांना फुलांना हातांची ओंजळ करून जपतात… स्वच्छता राखतात… इथल्या लाल मातीत इथल्याच भिरभिरणाऱ्या फुलपाखराप्रमाणे मनस्वी बागडतात.. हेच खरे जीवन शिक्षण….

बाकी काय…. पोराने किती पैसा कमावला हेच काहींसाठी यशाचे मापन असते. असल्या मनोवृत्तीला आपण काय करावे? पण ज्याला मातीचा वास खपत नाही आणि तिचा स्पर्श रुचत नाही त्याने स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेऊ नये…



ही शाळा मुलांना अक्षरांबरोबरच मानवतेचे, त्याचबरोबर निसर्गाबरोबरच्या सहसंबंधाचे जे शिक्षण देते ना, त्याला सलामच केला पाहिजे… त्यासाठी तिथले शिक्षक कौतुकाला पात्र आहेत… या अडवळणाच्या गावाला जायला नीट रस्ता नाही… इथे एसटी येत नाही.. आणिबाणीच्या प्रसंगी शहरात यायचे तर मोठे दिव्य करावे लागते… इंदापूर येथून 17 किलोमीटर वर आहे ते पण उजनीच्या पाण्यातून बोटीने प्रवास केल्यावर… अशा या सोशिक, शांत गावात शाळेचा हा देखणा परिसर मनाला समाधान दिल्या वाचून राहत नाही….

इथले काही मान्यवर मला म्हणाले की सर आम्ही देवळात नियमित जात नाही, पण या मराठी शाळेत नियमित येतो. इथल्या शाळेतील काही विद्यार्थी तर परदेशात या शाळेचा नावलौकिक वाढवत आहे हे समजल्यावर या गावाविषयीचा आपला आदर अजून वाढतो.. स्वच्छ व प्रशस्त स्वच्छतागृहे, फिल्टरचे पाणी त्याचबरोबर इतर साऱ्या सुविधांनी युक्त असणारी ही शाळा खऱ्या अर्थाने आधुनिक नालंदा पीठ आहे असेच म्हणावेसे वाटते…

सध्याच्या “मराठी शाळा वाचवा” या अभियानाच्या पार्श्वभूमीवर या शाळेच्या भौतिक सुविधा, नयनरम्य परिसर आणि गुणवत्ता ही मराठी शाळांना नाके मुरडणाऱ्यांच्या थोबाडावर एक सणसणीत चपराक आहे हे खरे….

या शाळेच्या रूपामध्ये शिक्षकां इतकाच गावातील सुजान व सुज्ञ नागरिकांचा ही मोलाचा वाटा आहे हे ओघानेच आले…. म्हणूनच मी म्हणेन की असेल थोडासा वेळ तर करमाळकरांनो राजकीय चर्चा मधून थोडीशी वाट वाकडी करून या शाळेला भेट द्यायला काहीच हरकत नाही. अडवळणाच्या या गावात सुद्धा गावकऱ्यांच्या इच्छा शक्तीच्या जोरावर ज्ञानाची प्रसन्न कारंजी कशी बहरून आलेली आहेत हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल…

✍️भीष्मा चांदणे, करमाळा जिल्हा सोलापूर, मो.9881174988

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!