सांगोल्यातील युथ फेस्टिवलमध्ये करमाळ्यातील झाडबुके महाविद्यालयाचे उत्कृष्ट सादरीकरण

करमाळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे आयोजित युथ फेस्टिवल २०२५ मध्ये झाडबुके बीसीए महाविद्यालय, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्कृष्ट सादरीकरण केले.

या स्पर्धांमध्ये मराठी वकृत्व स्पर्धेत कुमारी प्राची मिसाळ, मेहंदी स्पर्धेत दीक्षा कोपनर, तर मातीकाम स्पर्धेत प्रांजली वायकुळे यांनी सहभाग घेतला. स्पर्धकांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
वकृत्व स्पर्धेत प्राची मिसाळ हिने “सावध ऐका पुढच्या हाका” या विषयावर प्रभावी भाषण सादर केले. आपल्या भाषणात तिने एआयमुळे टेक्नॉलॉजीमध्ये झालेले क्रांतिकारक बदल आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर विचार मांडत, “भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर भूतकाळ आणि वर्तमानातील बदल ओळखणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले.

मातीकाम स्पर्धेत प्रांजली वायकुळे हिने मातीतून शेतकरी नांगर हाती घेऊन शेती करतानाचे जिवंत चित्रण साकारले. तिच्या कलाकृतीतून शेती, झाडे आणि शेतातील बारकावे वास्तवदर्शीपणे दिसून आले. दीक्षा कोपनर हिने मेंदी स्पर्धेत आकर्षक नक्षीकाम सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली.

करमाळा तालुक्यातून प्रथमच या महाविद्यालयाने युथ फेस्टिवल मध्ये सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत पूर्व प्रशिक्षण देण्यात आले होते. महाविद्यालयाच्या संघप्रमुख म्हणून प्रा. तेजस्विनी जाधव यांनी मार्गदर्शन केले.

बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षाताई ठोंबरे यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना प्राचार्य अतुल ढवळे आणि प्रा. श्रीकांत शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.



 
                       
                      