पर्यावरणाचा संदेश देत घारगाव जि.प.शाळेने काढली चिमुकल्याची दिंडी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – “जय जय राम कृष्ण हरी! ज्ञानोबा माऊली ,माऊली ,तुकाराम, मुक्ताबाई, जनाबाई ,एकनाथ” असा अखंड जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव मधील छोट्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे दिंडी काढली. यावेळी हातात भगवे झेंडे व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक “झाडे लावा झाडे जगवा”, “मुली वाचवा देश वाचवा”, “सुंदर माझे गाव स्वच्छ माझे गाव” , “पाणी वाचवा जलसंवर्धन करा” असे अनेक संदेश देणारे फलक हातात घेऊन पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी “नको पांडुरंग मला सोन्याचे चांदीचे दान रे! फक्त भिजव पांडुरंग हे तहानलेले रान रे!!” , “कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू! ढगाला थोडे हलवून भिजव माझे गाव तू!” असे विविध अभंग बोलत पालखी सोहळा साजरा करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई ,तुकाराम, एकनाथ, जनाबाई डोक्यावर तुळशी वृंदावन गळ्यात माळा विविध संतांची वेशभूषा करून गावात दिंडी काढण्यात आली.
हा बालगोपालांचा सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रामहरी जाधवर सर बुधवंत सर, खान सर कुलकर्णी सर चव्हाण सर पाटील मॅडम यादगिरी मॅडम व शिक्षक सहशिक्षका असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.