उत्तरेश्वर कॉलेजमध्ये संत तुकडोजी महाराज ग्रामगीता जीवन विकास परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा संचलित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता जीवन विकास परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर हे उपस्थित होते.
ग्रामगीता जीवन विकास परीक्षेच्या माध्यमातुन सुसंस्कार, आदर्श जीवन, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, सदाचार, स्वावलंबन आदींचा आदर्श पाठ घेण्यासाठी दरवर्षी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा घेण्यात येते. करमाळा तालुक्यात प्रथमच हे अभ्यासकेंद्र चालू झाले आहे.
या कार्यक्रमात बोलताना या अभ्यासकेंद्राचे संयोजक प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्याचा व राष्ट्र प्रेमाचा अभ्यास ग्रामीण भागातील मुलांना अवगत होण्यासाठी हे अभ्यास केंद्र खूप गरजेचे आहे. यातून केम सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास खूप मदत होणार आहे.
यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजच्या या नवीन उपक्रमास शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. प्राचार्य श्री एस.बी. कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन कार्य सांगणारी ग्रामगीता प्रवीण परीक्षा या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या परीक्षेसाठी उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज मधून एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.