खासदार सुळे यांनी करमाळा तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर करत केले कौतुक
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : मुलांना चांगल्या गोष्टी शिकविल्या तर त्याचं ते अनुकरण करतात असे कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच आपल्या फेसबुकच्या पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ करमाळा तालुक्यातील खातगाव क्र. २ येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांकडून बनवलेला आहे.
या व्हिडिओमध्ये विद्यार्थी बसने प्रवास करताना दाखवलेले आहेत. एक विद्यार्थी ड्रायव्हर असून बाकीचे सर्व प्रवासी आहेत. बस पूर्ण भरलेली असून विविध स्टॉप वरून बस मध्ये चढणारे दिव्यांग, गरोदर महिला, बाळासमवेत असणारी महिला, शाळेला जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना सहानुभूती दाखवत त्यांना आपण स्वतःहून बसायला जागा दिली पाहिजे व देशाचा एक संवेदनशील, जागरूक नागरिक बनले पाहिजे अशी शिकवण या व्हिडिओमार्फत दिलेली आहे.
हा उपक्रम चांगला असून, मुलांना अशा उपक्रमातुन चांगल्या गोष्टी शिकविल्या तर त्याचं अनुकरण ते प्रत्यक्ष जीवनात नक्कीच करतात असे मत खासदार सुळे यांनी मांडले. त्याचबरोबर हा उपक्रम राबविणारे शिक्षक, मुख्याध्यापक, बीडीओ मनोज राऊत आदी सर्वांचे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये कौतुक केले.
Facebook post link –https://fb.watch/hdsZP8jbEQ/