शामराव भोसले यांची एमपीएससी मधून 'वैधमापन शास्त्र निरीक्षक' पदाला गवसणी - Saptahik Sandesh

शामराव भोसले यांची एमपीएससी मधून ‘वैधमापन शास्त्र निरीक्षक’ पदाला गवसणी

पुणे (दि.२४) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वैधमापन शास्त्र निरीक्षक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून शामराव भोसले यांची निवड झाली आहे.  ही परीक्षा २०२३ मध्ये घेण्यात आली होती. राजपत्रित अधिकारी क्लास टू या पदावर त्यांची शासनाकडून नियुक्ती केली जाणार आहे. नगर जिल्ह्यातील जवळा हे शामराव यांचे मूळ गाव असून पुण्यामध्ये ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.  गेल्या ९ वर्षांपासून  अपयश व अडचणींवर मात करत अथक परिश्रम, सातत्य व जिद्दीतून त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शामराव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून घरी त्यांच्या बेताची परिस्थिती आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. अशा परिस्थितीत आईने कष्ट करून मुलांना मोठे केले. त्यांच्या आईचेही २०११ साली निधन झाले. अशा सर्व परिस्थितीत न खचता जिद्दीने शामराव यांनी विविध ठिकाणी शिक्षण घेत मेकॅनिकल इंजिअरिंगची पदवी मिळवली.

पदवीला असतानाच शामराव यांना स्पर्धा परीक्षा खुणावत होती. त्यामुळे त्यांनी  ‘एमपीएससी’चा अभ्यास करण्याचे ठरवले. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील ध्येय गाठायचे हे ठरवून इंजिनिअरिंग नंतर नोकरीचा विचार न करता २०१५ पासून स्पर्धा परीक्षेची पुण्यात तयारी सुरू केली. आर्थिक अडचणी असल्याने क्लासेस न लावता सेल्फ स्टडी वर भर दिला. त्यातून त्यांनी राज्यसेवेच्या व पीएसआय पदासाठीच्या अनेक परीक्षा गेल्या ७-८ वर्षात दिल्या.  पीएसआय या पदासाठी ते तीन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन आले आहेत व पाच वेळा मुख्य परीक्षा दिली होती. राज्यसेवा व इतर परीक्षेतही त्यांनी चांगले प्रयत्न केले परंतु थोडक्या गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली होती.

यंदा मात्र त्यांनी वैधमापन शास्त्र निरीक्षक (Legal Metrology Inspector) या पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे गेले आठ-नऊ वर्षांपासून चाललेला संघर्ष आता थांबला असून कष्टाचे चीज झाले आहे. सध्या त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

श्यामराव यांची निवड झाल्याचे समजताच मित्रांनी जल्लोष करत अभिनंदन केले

शामराव यांचे शिक्षण विविध ठिकाणी झाले आहे. प्राथमिक शिक्षण जवळा येथे, पाचवी- सहावी नगर जिल्ह्यातील  आश्रम शाळेत, सातवी आठवी शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूर, नववी- दहावी शिवाजी विद्यालय जवळा, अकरावी -बारावी पद्मश्री विखे पाटील कॉलेज प्रवारानगर लोणी येथे तर पदवीचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथून झाले.

निवडीनंतर मित्रांनी शामराव यांचा सत्कार केला.

गेल्या आठ-नऊ वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. अनेकवेळा थोडक्या गुणांनी यशाला हुलकावणी दिली. तीन वेळा पोलीस उपनिरीक्षक पदाचा मी इंटरव्यू दिला परंतु त्यात थोडक्यात अपयश आले. माझ्याबरोबर इंजीनियरिंग झालेले मित्र त्यांच्या क्षेत्रात सेटल झाले. लग्न होऊन संसारात सेटल झाले, परंतु मी संघर्ष करत होतो. कधी ना कधी यश मिळेल याची खात्री होती आणि अखेर केलेल्या कष्टाचे चीज झाले. माझ्या लहानपणापासून आजी-आजोबा, मामा, भाऊ यांनी माझ्या शिक्षणाला पाठबळ दिले आहे. अनेकवेळा माझ्या जवळच्या मित्रांनी मला आर्थिक मदत केली आहे. माझ्या यशात त्यांचा देखील वाटा आहे.

  • शामराव भोसले

काय आहे ही पोस्ट?

वैध मापनशास्त्र ही वजन माप विषयक अधिनियम व नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेचे निरीक्षक व्यापाऱ्यांकडे असलेल्या वजन व मापांची पडताळणी करतात. चुकीच काम करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे असतात. ग्राहक संरक्षणार्थ कायदा व नियमांची अंमलवजावणीचे काम ते करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!