खडतर परिश्रमाने जीवनात यश मिळवता येते – वित्तलेखाधिकारी दयानंद कोकरे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – खडतर परिश्रम, जिद्द ,चिकाटी व प्रयत्न केल्यास जीवनात उत्तुंग यश मिळवता येते असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे वित्तलेखाधिकारी व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय माजी विद्यार्थी दयानंद कोकरे यांनी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व्यक्त केले. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील व उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शना खाली या स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेसाठी यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वतःच्या विद्यार्थी दशेतील अनुभव सांगितले. “या महाविद्यालयामुळेच मी अधिकारी होऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे” असे सांगून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपले मनोगत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य मिलिंद फंड यांच्या हस्ते श्री.दयानंद कोकरे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण राख यांनी केले तर आभार क्रीडाशिक्षक प्रा. रामकुमार काळे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व तालुक्यातील सर्व विद्यालयाचे क्रीडाशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.