केममध्ये श्रावणी सोमवारनिमित्त सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

केममध्ये श्रावणी सोमवारनिमित्त सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथे श्रावणी सोमवारनिमित्त तळेकर गल्लीच्या वतीने पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम मोठ्या…

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथे श्रावणी सोमवारनिमित्त तळेकर गल्लीच्या वतीने पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ३०० वर्षांची ऐतिहासिक सोंग काढण्याची परंपरा केममधील तरुणांनी यंदाही उत्साहाने कायम राखली.

श्रावण महिन्यातील चारही सोमवारी गावातील विविध गल्लींच्या वतीने सोंगाच्या गाड्या काढण्याची परंपरा आहे. त्यानुसार दुसरा सोमवार तळेकर गल्लीचा असतो. यावेळी तळेकर गल्लीतील युवकांनी आठ सोंगाच्या गाड्या काढल्या. त्यामागे श्री उत्तरेश्वर देवस्थानचा रथ सहभागी झाला होता.

यामध्ये गोमीची गाडी, पोतराज-कडक लक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशहा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती संभाजी महाराज, कौरव-पांडव, रावण आदी सोंगाच्या गाड्यांचा समावेश होता. या ऐतिहासिक सोंगाच्या गाड्या पाहण्यासाठी केम तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशहा यांच्या सोंगातील कलाकारांची भाषणे. ही भाषणे ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम पाहत सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधोरेखित केला.
केममधील तरुण पिढीने पारंपरिक सोंगाच्या गाड्यांची ही ऐतिहासिक परंपरा जपल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!