नागराज मंजुळेंच्या आगामी ‘खाशाबा’ चित्रपटाची ऑडिशन सुरू – युवा कुस्तीपटूंना नामी संधी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून यामध्ये कुस्तीपटू असणाऱ्या तरुण खेळाडूंना चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे.
१९५२ च्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताकडून पहिले वैयक्तिक पदक (कांस्यपदक) मिळविणारे कुस्तीपटू पै. खाशाबा जाधव यांच्या जीवनपटावर हा चित्रपट असणार आहे. यामुळे या चित्रपटात कुस्ती खेळ येणाऱ्या खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. यासाठी होणाऱ्या ऑडिशनचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.

ही ऑडिशन कुस्ती खेळ येणाऱ्या मुलांसाठी (पुरूष) असून ७ ते २५ वर्षे वयोगटातील मुले यात ऑडिशन देऊ शकतात. मुलांना मराठी भाषा येणे आवश्यक असणार आहे. मुलांना माती आणि मॅटवरची दोन्ही कुस्ती प्रकार येणे आवश्यक आहे.
ही ऑडिशन देण्यासाठी सुरुवातीला एक फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे. फॉर्म मध्ये आपल्या जिल्ह्यानुसार विभाग निवडून माहिती भरायची आहे. याबरोबरच पाच फोटो (त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे), ३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ, ३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ अशा गोष्टी फॉर्म सोबत जोडायच्या आहेत. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे. फॉर्म भरण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकचा वापर करावा – https://forms.gle/YUX23Uhji4oPzL4W9

