राजुरीत लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेसाठी १ लाख ७७ हजारांचा निधी

करमाळा(दि. ३): “शाळा म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर गावाच्या भविष्याची पायाभरणी” ही भावना प्रत्यक्षात उतरवत करमाळा तालुक्यातील राजुरी गावाने ग्रामीण शिक्षणासाठी लोकसहभागाचा उल्लेखनीय आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत तब्बल १ लाख ७७ हजार रुपयांचा निधी संकलित केला आहे.

नुकत्याच पुनर्गठित झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीने पदभार स्वीकारताच पहिला निर्णय शाळेच्या हिताचा घेतला. “सरकारी शाळा म्हणजे आपलीच शाळा” या भावनेतून समितीने स्वखर्चातून निधी उभारणीचा संकल्प केला आणि अल्पावधीतच तो यशस्वी करून दाखवला.
समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब निरगुडे यांनी ७१ हजार रुपयांची देणगी देत पुढाकार घेतला. उपाध्यक्ष रेश्मा पवार यांनी ५१ हजार रुपयांची भरीव मदत करून महिला नेतृत्वाचा ठसा उमटवला.
तसेच सदस्य गोकुळ साखरे (१६ हजार), उद्योजक संतोष कुलकर्णी (११ हजार), सचिन सराटे (१० हजार) आणि काकासाहेब दुरंदे (१० हजार) यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान दिले.

महिला सदस्य अर्चना दुरंदे, मोहिनी शिंदे, स्वाती शिंदे व कोमल गरुड यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत देत उपक्रमात सहभाग नोंदवला. देशसेवेचा अभिमान असलेले मेजर अनिल साखरे यांनी ११ हजार रुपयांची मदत केली. ग्रामपंचायत सदस्या डॉ. विद्या दुरंदे यांनी पुढील काळात विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा देण्याची घोषणा केली.
शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पानसरे म्हणाले, “हा निधी केवळ आर्थिक मदत नाही, तर ग्रामस्थांनी शाळेवर दाखवलेला विश्वास आहे. ‘गावाला शाळेचा अभिमान’ ही भावना राजुरीत जिवंत आहे.”
या निधीतून शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी नियोजनबद्ध कामे केली जातील, असे शिक्षकवृंदाने सांगितले.

या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास राजेंद्र भोसले, सतीश शिंदे, उदय साखरे, शिक्षक दिलीप बोराडे, बबन रोडे, चंद्रकांत ढवळे, गजेंद्र कुदळे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक अंकुश सुरवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुभाष पानसरे यांनी केले.
आज अनेक ठिकाणी सरकारी शाळा टिकवण्यासाठी संघर्ष सुरू असताना, राजुरी गावाने शाळेला आपल्या हक्काची व अभिमानाची जागा दिली असून समाज आणि शाळा एकत्र आल्यास ग्रामीण शिक्षणाचा चेहरा बदलू शकतो, हे कृतीतून दाखवून दिले आहे.

