१४ वर्षीय मुलीच्या अवयवादानामुळे तिघांना जीवदान
करमाळा (दि.३) – सांगलीतील उषःकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्षातील चौथे अवयव दान शस्त्रक्रिया यशस्वी झाली. उषःकाल अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केवळ १४ वर्षीय ब्रेन डेड रुग्णाचे यकृत, किडणी व डोळे प्रत्यारोपणासाठी दान करण्यात आले. यकृत, किडनी पुण्याला पाठवण्यात आले व डोळे सांगलीतील रुग्णालयात पाठवण्यात आले.
‘उषःकाल’चे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोग्रेकर यांनी याबाबत संदेश न्यूजला माहिती देताना सांगितले की, बागणी (ता. वाळवा) येथील १४ वर्षीय राजनंदिनी पाटील घरीच चक्कर येऊन पडली. त्यांना एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाच-सहा दिवसांनी त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यानंतर सदर ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाईकांचे डॉ. वसीम मुजावर यांनी प्राथमिक समुपदेशन करून त्यांना अवयव दानाबद्दल माहिती दिली. त्यांच्या नातेवाईकांनी उषःकाल हॉस्पिटलशी संपर्क साधला.
उषःकाल हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद मालानी यांनी पेशंटच्या नातेवाईकांचे संपूर्ण समुपदेशन केले. यानंतर मुलीच्या स्मृती अवयव रुपात राहतील या भावनेने नातेवाईक रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर आज सकाळी व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद परीख व वैद्यकीय संचालक डॉ. मालानी आणि त्यांच्या टीमने यांनी अवयव दान करण्यासाठी लागणाऱ्या सर्व तपासण्या व इतर प्रक्रियांची पूर्तता पूर्ण करून घेतली.
आज या रुग्णाचे यकृत व किडणी शस्त्रक्रियेद्वारे काढून ते ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पुण्याला व डोळे सांगली येथील गरजू रुग्णाला प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास पुण्याला रवाना करण्यात आले. त्यावेळी राजनंदिनीच्या वडिलांसह नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.
यावेळी उषःकाल अभिनव हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद परीख, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय कोगरेकर, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर स्वाती काकती उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर, सिव्हिल सर्जन डॉ. विक्रमसिंह कदम, सांगली शहर उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.