लोकन्यालयात 182 खटले तडजोडीने निकाली – तर बँकांची जवळपास दोन कोटी रूपयांची वसुली
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.14) : येथील न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यालयात काल(ता.13) 182 खटले तडजोडीने निकाली निघाले आहेत. या लोकन्यालयात बँकांची एक कोटी 97 लाख16 हजार 500 रूपयांची वसुली झाली आहे.
या लोकन्यालयाचे आयोजन येथील न्यायालयात करण्यात आले होते. या लोकन्यालयाचा शुभारंभ करमाळा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मीना प्रकाश एखे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सहदिवाणी न्यायालयाधीश राजू शिवरात्री,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विकास जरांडे,उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव,सचिव योगेश शिंपी व वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकन्यालयात दिवाणी व फौजदारी प्रलंबित खटल्यापैकी 75 खटले निकाली निघाले. तर दाखलपुर्व 105 खटले निकाली निघाले आहेत. त्यामध्ये 8,75,611/- रक्कम वसुल झाला आहे. तर बँकेची 57 दाखलपूर्व प्रकरणे निकाली असून त्यात एक कोटी सत्यान्नव लाख सोळा हजार पाचशे सत्तावीस रूपये रक्कम वसूल झाली आहे. ग्रामपंचायत व नगरपरिषद दाखल पूर्व प्रकरणापैकी 50 प्रकारणामध्ये तडजोड करून 2 लाख 60 हजार 663 रुपये वसुल केले आहेत.
लोकन्यालयात मोठी गर्दी होती. यावेळी एका खटल्यात 90 वर्षाचे आजोबा तडजोडीसाठी चारचाकी गाडीत बसून होते. ही हकीकत समजताच न्यायाधीश मीना एखे यांनी तात्काळ न्यायदालन सोडून बाहेर आवारात आल्या. संबंधित आजोबाची चौकशी करून, खटल्याबाबत विचारना केली व त्या तडजोडीस मान्यता दिली. या प्रकरानंतर संबंधित पक्षकार भारावून गेले.