वीटजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी- १९ वर्षीय मयूर क्षीरसागरचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.८: वीट गावाजवळ पाझरतलावाजवळील उताराला आज ( ता.८) पहाटे ३ वाजता ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात मयूर पप्पू क्षीरसागर (वय १९) रा. पोंधवडी या तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मयूर क्षीरसागर हा आज पहाटे ३ च्या सुमारास भैरवनाथ साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना, उतारावर ट्रॅक्टरवरील ट्रॉलीचा ताण वाढल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि वाहन पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की मयूर ट्रॅक्टरखाली दबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अवघ्या १९ वर्षांच्या या तरुणाने इतक्या लहान वयात ट्रॅक्टर चालवत कुटुंबाचा संसार सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने, त्याचे आई-वडील नसून तो आपल्या आजी- आजोबांसोबत राहत होता. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण पोंधवडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

मयूरच्या मृत्यूने गावातील युवक वर्गातही शोकाकुल झाला आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, “इतक्या लहान वयात जबाबदारी घेतलेला मेहनती मुलगा आपल्यात नाही, ही अतिशय वेदनादायक बाब आहे.”
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.



