श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या कामगारांना एमएससी बँकेकडील ३ कोटी ३२ लाखांचा न्याय — संचालक ॲड. राहुल सावंत व डॉ. हरिदास केवारे यांचा सत्कार -

श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या कामगारांना एमएससी बँकेकडील ३ कोटी ३२ लाखांचा न्याय — संचालक ॲड. राहुल सावंत व डॉ. हरिदास केवारे यांचा सत्कार

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.८: येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा एमएससी बँकेकडे साखर विक्रीवरील थकलेला ३ कोटी ३२ लाख ८२ हजार ११९ रुपये (व्याजासहित) इतका हक्काचा निधी अखेर मिळवून देण्यात आला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत आणि डॉ. हरिदास केवारे यांचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम श्री आदिनाथ महाराज मंदिर येथे पार पडला. यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि आमदार नारायण (आबा) पाटील, खा. धैर्यशील (भैय्या) मोहिते पाटील, तसेच आ. रणजितसिंह (दादा) मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

सहा वर्षांपासून एमएससी बँकेत पेंडिंग असलेली रक्कम मिळविण्यासाठी ॲड. सावंत व डॉ. केवारे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी चेअरमन, संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन सोलापूर येथील मे. कोर्टात स्वतः हजर राहून पाठपुरावा केला. मा.न्यायालयाधीश कुंभार यांनी कारखान्याने दाखल केलेला अर्ज मंजूर करत पहिल्या टप्प्यात ₹२५,१४,७८०९ (व्याजासहित) रक्कम कामगारांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पहिल्या टप्प्यातील रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामगारांची रक्कम जमा होणार असून ज्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही, त्यांनी मे. कोर्टात अर्ज दाखल करण्याचे आवाहन ॲड. राहुल सावंत यांनी केले. तसेच आवश्यक असल्यास त्यांनी वैयक्तिक संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यकारी संचालक अरुण बागनवर, ओएस मधुकर कदम, चिफ इंजिनिअर जाधव , चिफ केमिस्ट कुलकर्णी , डिप्युटी चिफ इंजिनिअर दिपक देशमुख, डिप्युटी चिफ केमिस्ट मोहीते , आरएम जाधव, तसेच कामगार प्रतिनिधी ऊत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब महाडीक, बाबा शिंदे, महेश मोरे, कुंडलिक शिंदे, राहुल झिंजाडे, दादासाहेब रासकर, बाबासाहेब केकान, काकासाहेब भानवसे, दिलीप झिंजाडे, वजीर भाई, वनराज बाळशंकर, हनुमंत पाटुळे, युवराज टकले, देविदास कुंभार, गणेश कराड, बाळासाहेब थोरात, विकास नरसाळे, सुग्रीव नलवडे, विजय जगदाळे, विक्रम पाटील, शामराव लोंढे, गणेश सरक, रवी दळवी आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!