करमाळा तालुक्यातील ४ साखर कारखान्यांचे २६ जानेवारी पर्यंत ९ लाख मे.टन ऊसाचे गाळप..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा : तालुक्यातील चार साखर कारखान्याकडून २६ जानेवारी पर्यंत ९ लाख २ हजार १८२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे. विशेषतः तालुक्यातील चार साखर कारखान्यापेक्षा बाहेरील कारखान्यांनी जवळपास १२ लाख मेट्रीक टन तालुक्यातील ऊसाचे गाळप केले आहे.
करमाळा तालुक्यातील चारही साखर कारखाने सुरू झाले आहेत. विशेषत: आदिनाथ कारखाना हा फारच उशीरा म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाला आहे. आदिनाथ कारखान्यात आत्तापर्यंत ३० हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. मकाई साखर कारखान्यात ९५ दिवस ऊसाचे गाळप होऊन आत्तापर्यंत १ लाख ४१ हजार ७५५ मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. सर्वात जास्त गाळप कमलाभवानी साखर कारखान्यात ७८ दिवसात ४ लाख २५ हजार ३५७ मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे तर भैरवनाथ शुगर विहाळ येथे ८९ दिवसात ३०५०७० मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे. तालुक्यातील ऊस बाहेरील साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात गाळप केला आहे. अंबालिका, बारामती ॲग्रो, श्रीराम हाळगाव, साई कारखाना हिरडगाव, विठ्ठल शुगर्स म्हैसगाव, विठ्ठलराव शिंदे निमगाव तसेच पंढरपूर, इंदापूर आदी कारखान्यांनी तालुक्यातील जवळपास १२ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे.
करमाळा तालुक्यातील चार कारखान्याचे गाळप ९ लाख मेट्रीक टन तर विठ्ठलराव शिंदे माढा या एकट्या कारखान्याचे १२ लाख ३५ हजार २१५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. विशेष म्हणजे या कारखान्याचा साखर उताराही ९.७६ असा आहे. तालुक्यातील साखर कारखान्याचा सरसरी साखर उतारा पावणेआठ पासून पावणेनऊ एवढाच आहे. गेल्या दिड महिन्यापासून तालुक्यातील कारखान्यांनी ऊस उत्पादकाची बिले न दिल्याने ऊस देण्यावर परिणाम झाला आहे. नुकतेच काही कारखान्यांनी काटापेमेंट सुरू केले आहे. कारखान्याकडून बिले न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले असून नाराज व निराश आहेत.