शेअर्सची रक्कम दुप्पट करून देतो म्हणून सहा लाखाची फसवणूक..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : शेअर्सची रक्कम दोन महिन्यात दुप्पट करून देतो असे म्हणून तालुक्यातील चौघांकडून दीड-दीड लाख रूपये घेऊन खोटे चेक देऊन फसवणूक केली आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसात २४ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुजित बागल (मांगी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की जानेवारी २०२४ मध्ये मी कमलभवानी साखर कारखान्यावर गेलो असताना तेथे आंध्रप्रदेशातील अधिकारी श्रीनिवास मिंडा हे भेटले. त्यावेळी त्यांची ओळख झाली. त्यानंतर एकाच आठवड्यात श्री. मिंडा व त्यांचे सहकारी कलविंदर सिंह जरनेल सिंह हे भेटले. त्यावेळी माझ्या सोबत समाधान भोगे ( अर्जुननगर), गणेश सरडे (करंजे), सागर शिंदे (जातेगाव) हे होते. त्यावेळी या दोघांनी आम्ही शेअर मार्केट रक्कम गुंतविल्यास दोन महिन्यात शंभर टक्के परतावा देत असतो. त्याला आधार म्हणून आमच्या खात्याचा चेक देतो.
त्यामुळे आमचा विश्वास बसला व आम्ही चौघांनी दीड-दीड लाख रूपये गोळा करून सहा लाख रूपये या दोघांना दिले. त्यावेळी त्यांनी १२ लाख रूपये रकमेचा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वारासीगुडा या शाखेचा चेक दिला. प्रत्यक्षात मुदत संपल्यावर बँकेत चेक टाकण्यापूर्वी त्यांना संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. यावरून त्यांनी आमची फसवणूक केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला पुढील तपास सुरू आहे.