दारू विक्रेत्यावर कारवाई – मोटारसायकलसह ६७ हजाराचा ऐवज
करमाळा (संदेश प्रतिनिधी)- मोटारसायकलवरून विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दारू विक्रेत्यावर पोलीसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून मोटारसायकल व विदेशी दारू सह ६७ हजार ८० रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. ही घटना २७ जानेवारीला सकाळी पावणेदहा वाजता जेऊर ते कुंभेज फाटा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास जगन्नाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की बातमीदारा मार्फत जेऊर – कुंभेज रस्त्यावर विदेशी दारूची मोटारसायकलवरून विक्री करण्यासाठी वाहतूक होत असल्याची माहिती समजली. त्यानंतर आम्ही पोलीसांनी त्याचा पाठलाग केला असता, आकाश भारत गरूड (रा. राजुरी )याच्याकडे ७ हजार ८० रूपयाची मॅकडॉल, रॉयल स्टॅग, टूबर्ग कंपनीची दारू सापडली आहे. तसेच ६० हजार रूपये किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एमएच ४५ एएन ३८५४ मिळून आली आहे. या सर्व गोष्टी जप्त केल्या आहेत.