सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 60 लाख निधी मंजूर..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर जिल्ह्यात माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. महसूल व वन विभाग ( मदत व पुनर्वसन ) या कार्यालयाकडून सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीची माहिती भरण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर 20 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार सन 2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता सोलापूर जिल्ह्यातील 63 हजार 716 बाधित शेतकऱ्यांना 40674 हेक्टर क्षेत्रासाठी 46 कोटी 89 लाख अनुदान मंजूर करण्यात आले होते.
सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले 46 कोटी 89 लाख रकमेपैकी 32 कोटी 60 लाख अनुदान प्राप्त होते, त्यापैकी उर्वरित बाकी असलेले 14 कोटी 29 लाख अनुदान येणे बाकी होते. यासंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे ऑगस्ट 2023 मध्ये पत्रव्यवहार केला. तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद सो यांनाही यासंदर्भात निवेदन दिले होते. आमदार संजयमामा शिंदे यांच्या सदर पाठपुराव्याला यश आले असून करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे.
सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या खातेदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे .ही यादी सजावर / गावाच्या ठिकाणी प्रसिद्धीस दिलेली संबंधित खातेदारांनी विशिष्ट क्रमांक घेऊन आधार प्रमाणीकरण करावे.आधार प्रमाणिकरण केल्यानंतर खातेदाराचे खातेवर रक्कम जमा होईल.ज्यांचे विशिष्ट क्रमांक यादीत नसतील त्यांची यादी तयार करून सोलापूर कार्यालयाकडे पाठवली जाईल. त्यांचेही विशिष्ट क्रमांक काही दिवसात मिळतील.