उमरड येथे तुफान पाऊस; वादळात एक म्हैस मृत्युमुखी, शेतीचे मोठे नुकसान

करमाळा(दि. १९ मे) – आज दुपारी तीन ते चारच्या दरम्यान उमरड परिसरात अचानक तुफान पाऊस व वादळाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पावसामुळे फळबागा उध्वस्त झाल्या असून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर कोसळलेल्या झाडांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याच पावसात उमरड मधील शेतकरी रघुनाथ विष्णू भिसे यांची एक म्हैस वादळात अडकून जागीच मृत्युमुखी पडली.

पावसामुळे केळीच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडे त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.




