इंजिनिअर पत्नीचाही दहा लाखासाठी छळ – सासरच्या चौघावर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : नोकरी करणाऱ्या इंजिनिअर पत्नीला दहा लाखाची मागणी करून छळ करणाऱ्या सासरच्या चौघाजणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात सोनाली तुषार लबडे (रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा. ह. रा. पोथरे, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझे शिक्षण इलेक्ट्रॉनिक ॲन्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये बी. इ. झालेले आहे. १४ डिसेंबर २०२२ ला बेलवंडी येथील तुषार शहाजी लबडे यांच्याबरोबर लग्न झाले.
मी बजाज फायनान्स लि; निगडी (पुणे) येथे नोकरी करत आहे. लग्नानंतर सुरूवातीला माहेराहून अंगठी आण म्हणून त्रास सुरू केला. नंतर स्वयंपाक करता येत नाही म्हणून त्रास सुरू केला. त्यानंतर माझ्या पतीने तुझ्या पगारावर दहा लाखाचे कर्ज काढ म्हणून मागणी केली, परंतू मला कंपनीने कर्ज देण्यास नकार दिला. हे सांगितल्यावर माझे पती, सासू, सासरे, दीर हे सर्वजण आले व तुझ्या माहेराहून दहा लाख रूपये घेऊन ये म्हणून त्यांनी मला त्रास देऊन मारहाण करून पुणे येथून हाकलून दिले.

यात माझे पती तुषार लबडे, सासू अलका लबडे, सासरे शहाजी लबडे, दीर दिपक लबडे (सर्व रा.बेलवंडी, ता.श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर हे करत आहेत.

