विवाहितेच्या छळ प्रकरणी पोलिस पतीसह सासूवर गुन्हा दाखल -

विवाहितेच्या छळ प्रकरणी पोलिस पतीसह सासूवर गुन्हा दाखल

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२८: पती व सासू यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी  सौ. तेजश्री प्रविण ढवळे (वय 27), रा. सध्या शिवाजीनगर, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर; मूळ रा. पोथरे, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी ही फिर्याद दिली आहे.

त्यात  त्यांनी म्हटले, की माझा विवाह 5 एप्रिल  2021 रोजी  प्रविण शिवाजी ढवळे (रा. शिवाजीनगर, श्रीगोंदा) यांच्याशी झाला. सुरुवातीस काही दिवस संसार सुरळीत होता. त्यानंतर मात्र पती प्रविण व सासू कल्पना यांनी शारीरिक व मानसिक छळास सुरुवात केली.

माझे पती महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असूनही त्यांनी वारंवार संशय घेत मारहाण केली. गरोदरपणाच्या काळातही घराबाहेर पडू दिले नाही, तसेच इंदापूर येथील हॉस्पिटलमध्ये झालेल्या डिलेवरीचा खर्च सुद्धा पतीकडून दिला गेला नाही. हा सर्व खर्च तिच्या वडिलांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन केला.

पुढे मुली झाल्याच्या कारणावरून सासू कल्पना यांनी ‘मुलगा झाला नाही’ म्हणून शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली. दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सातच्या सुमारास पती प्रविण व सासू कल्पना यांनी मला पैशासाठी तसेच संशयाच्या कारणावरून हाताने मारहाण केली. त्यानंतर माझ्या दोन्ही मुली हिसकावून घेत, मला घरातून हाकलून दिले व जिवे मारण्याची धमकी दिली.


या घटनेनंतर मी माझे काकांना फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनी मला माहेरी पोथरे (ता. करमाळा) येथे आणून सुरक्षित ठेवले.

या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात पती प्रविण शिवाजी ढवळे व सासू कल्पना यांच्याविरुद्ध छळवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!