खोट्या कागदपत्रावरून खोटा दस्त करून फसवणुकीबद्दल दोघांवर गुन्हा दाखल
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा : खोटे कागदपत्र करून व खोटा दस्त करून फसवणूक केल्या प्रकरणी जेऊर येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा न्यायाधीशांच्या आदेशानंतर पोलीसांनी दाखल केला आहे.
या प्रकरणी डॉ. हेमंत पांढरे (जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की जेऊर येथील शासकीय जागेवर जेऊरचे ग्रामविकास अधिकारी यशवंत बबन कुदळे यांनी भास्कर पांडूरंग कांडेकर यांचे नाव लावून ग्रामपंचायतीचा नमुना नं.८ चा उतारा दिला. त्यानुसार श्री. कांडेकर यांनी मला सदरची जागा ३ नोव्हेंबर २०२१ रोजी विक्री केली आहे. प्रत्यक्षात श्री.कांडेकर यांच्या मालकीची जागा नसताना यशवंत कुदळे यांनी खोटा उतारा दिला व श्री.कांडेकर यांनी ती जागा मला विक्री करून माझी फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.