घोटी ग्रामस्थांची ३ कोटी ३७ लाखाची फसवणूक – रेवणन्नाथ ननवरे यांचे विरूध्द गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : घोटी येथील ग्रामस्थांकडून शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ३ कोटी ३७ लाख ३४ हजार १५० रूपये घेऊन फसवणूक केली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी याच गावातील रेवणनाथ लक्ष्मण ननवरे (रा. घोटी) याचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यात बाळासाहेब पोपट राऊत (रा. घोटी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की रेवणनाथ लक्ष्मण ननवरे हा घोटी गावातील असून तो आय.टी. कंपनीत पुणे येथे नोकरी करतो.
काही दिवसापूर्वी तो गावात आला व माझ्या घरी आला. त्याने मला सांगितले, की … माझे शेअर्स मार्केट मध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक आहे. तुम्हीही माझ्याकडे तुमचे गुंतवा. तुम्हाला चांगला परतावा देईन. त्यानुसार दि. ३०/५/२०२४ ला मी १० लाखाचा चेक दिला. त्यानंतर त्याने मला १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान तुम्हांस परतावा देण्याचे सांगितले. दरम्यान १० ऑगस्टला तो फरार झाला आहे. त्या माझ्याबरोचर गावातील अन्य ३१ जणांकडून अंदाजे ३ कोटी ३७ लाख ३४ हजार १५० रूपये घेऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.