वरकटणे येथे सामायिक जागेच्या वादातून महिलेस मारहाण; पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल -

वरकटणे येथे सामायिक जागेच्या वादातून महिलेस मारहाण; पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

करमाळा | संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वरकटणे (ता. करमाळा) येथील गट नंबर 165/4/ब मधील सामायिक जागेच्या वादातून एका 58 वर्षीय महिलेवर शिवीगाळ व मारहाण केल्याची गंभीर घटना 15 जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


याबाबत श्रीमती शोभा बाळासाहेब माने (वय 58, रा. वरकटणे) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संबंधित गट नंबरमध्ये सामायिक स्वरूपाचे घर असून त्या ठिकाणी शोभा माने या एकट्याच वास्तव्यास आहेत. संक्रांत सणानिमित्त त्यांच्या घरी सून व नातवंडे आलेली असताना हा प्रकार घडला.


फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, संशयित पृथ्वीराज उर्फ सोन्या राजेंद्र माने याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने घरालगतच्या सामायिक जागेत अचानक काम सुरू केले. सदर जागेची चतुरसीमा अद्याप निश्चित नसल्याने आणि भविष्यात वाद निर्माण होऊ नये म्हणून काम थांबवण्याची विनंती फिर्यादीने केली. मात्र या विनंतीचा राग आल्याने संशयिताने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली.


इतकेच नव्हे तर संशयिताने ठिबक सिंचनाच्या पाईपच्या तुकड्याने फिर्यादीच्या हातावर, डोक्यावर व पाठीवर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच घरासमोर वाहने उभी केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत “तुझ्या कुटुंबावर खोट्या केसेस दाखल करून अडकवीन,” अशी भीती निर्माण करणारी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.


घटनेदरम्यान फिर्यादींच्या सुनेने हस्तक्षेप करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीने आपल्या मुलास घटनेची माहिती देत त्याला बोलावून घेतले. पुढे करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी फिर्यादीस शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. उपचारानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118 (1), 351 (2) व 352 अन्वये संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!