बालविवाह प्रकरणी पालकावर गुन्हा दाखल

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – पांडे गावचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम पाहणारे गणपत रंगनाथ नायकुडे (वय 55, रा. सालसे) यांनी अल्पवयीन मुलीचा झालेला बालविवाह प्रकरणासंबंधी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

18 ऑक्टोबर 2025 रोजी करमाळा पोलीस ठाण्यातील हवालदार जोतीराम बाळसराफ यांनी नायकुडे यांच्याशी संपर्क साधून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांच्या पत्रानुसार अल्पवयीन मुलगी (वय 15, रा. विठ्ठलवाडी, ता. पंढरपूर) हिचा विवाह 16 जून 2025 रोजी अथर्व मंगल कार्यालय, कमलाई देवी मंदिराजवळ, करमाळा येथे करण्यात आल्याची माहिती दिली.

यासंदर्भात पिडीत मुलगी व तिचे वडील कल्याण हरी कुंभार यांना बालकल्याण समितीकडे हजर करण्यात आले. चौकशीदरम्यान पिडीत मुलीच्या वडिलांनी बालविवाह झाल्याची कबुली दिली. नंतर संबंधित प्रकरणाची माहिती अधिकृतपणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. यानंतर बालविवाह प्रतिबंध अधिकारी नायकुडे फिर्याद दिली.

तक्रारनाम्यात पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचे वडील कल्याण हरी कुंभार (रा. विठ्ठलवाडी), तसेच अप्पा हणुमंत कुंभार, हणुमंत दिगंबर कुंभार आणि कमल हणुमंत कुंभार (रा. पांडे) यांनी मिळून हा विवाह लावून दिल्याचे त्यात म्हटले आहे. सदर प्रकरणी संबंधितांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

