मैत्रीणीला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न – तरूणाविरूध्द गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : माझ्या बरोबर चल अन्यथा तुला नांदू देणार नाही व जिवंतही ठेवणार नाही, असे म्हणून मित्राने मैत्रिणीला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्रकार ५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता रावगाव (ता. करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी विवाहित २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की माझे मुळ गाव वीट असून, सध्या मी माझ्या पती सोबत रावगाव येथे राहत आहे. पूर्वी वंजारवाडी येथे काम करत असताना देवळाली येथील विशाल लोंढे याच्याबरोबर ओळख झाली व त्यातून त्याची व माझी मैत्री झाली.
या मैत्रीतून त्याने मला करमाळ्याहून मोटारसायकलवर वुरवंडे, ता. मुळशी, जि. पुणे येथे घेऊन गेला होता. त्यानंतरही तो सतत माझ्याकडे ये-जा करीत होता. ५ ऑगस्टला दुपारी बारा वाजता तो माझ्या राहत्या घरी आला व तो माझ्याबरोबर चल म्हणत होता. मी त्यास नकार दिल्याने त्याने जबरदस्तीने मला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर हे करत आहेत.