पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधीत ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा

0

करमाळा (दि.२९) –  मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधीत ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करणेबाबत व बदलापूर जिल्हा ठाणे येथील शाळेतील चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ काल (दि.२९)  करमाळा तहसील कार्यालयाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करमाळा तालुका समन्वयक कुमार माने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा सोमवारी (दि.२६) कोसळला. या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ६ महिन्यात कोसळला असल्याने महाराष्ट्राची अस्मिता ढासळली आहे. शिवप्रेमींची मान शरमेने खाली जाईल असे कृत्य घडलेले आहे.त्यामुळे सदर घटनेस जबाबदार असलेले संबंधित विभागाचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करावा व तसेच बदलापूर जिल्हा ठाणे येथील शाळेतील चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपुर्ण देश हादरला आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तरी या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहुदादा फरतडे, महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, युवासेना उपशहर प्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव,किशोर पवार, नबी कुरेशी, संघर्ष लांडगे,अनिकेत ढावरे, ओंकार कोठारे, भाऊ मस्तुद व अनेकशिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!