वांगी नं.४ येथे शेतातील वादातून शेतकऱ्यास मारहाण

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.९: वांगी नंबर ४ (ता. करमाळा) येथे शेतातील वादातून शेतकऱ्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना ६ नोव्हेंबर ला घडली. या प्रकरणी पांडुरंग भिका राखुंडे (वय ६०, धंदा शेती, रा. वांगी नं. ४, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सन १९९३ मध्ये गट नंबर १८/३ मधील अडीच एकर शेती जमीन जगन्नाथ गोपीनाथ कांबळे यांच्याकडून खरेदी केली होती. मात्र महादेव गबाजी कांबळे यांनी ही जमिन वहिवाटीस विरोध केला होता. त्या संदर्भात त्यांनी करमाळा न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात निकाल फिर्यादींच्या बाजूने लागल्याने विरोधक चिडले होते.

६ नोव्हेंबर ला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राखुंडे हे आपल्या जमिनीत जनावरे चारत असताना, भगवान महादेव कांबळे, विलास ढावरे, सागर ढावरे, चिल्या ढावरे (सर्व रा. वांगी नं. १, ता. करमाळा) व तीन अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांनी “तू येथे जनावरे का चारतोस?” असा जाब विचारत वाद घातला. त्यावेळी भगवान कांबळे यांनी दगडाने राखुंडे यांच्या नाकावर मारहाण करून त्यांना जखमी केले. चिल्या व सागर ढावरे यांनी पाठीत दगडाने मारहाण केली, तर विलास ढावरे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, फिर्यादींची पत्नी मनिषा राखुंडे या सोडवायला आल्यावर तिलाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. “तू आता वाचलास, पुढे पाहून घेतो” अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले, असे फिर्यादीने म्हटले आहे.
करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

