भाजप शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

करमाळा (दि.१५ जुलै): शहरातील भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर सोमवारी (दि. १४ जुलै) दुपारी सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. देवीचामाळ रोडवर बायपास चौकाजवळ असलेल्या अग्रवाल यांच्याच ‘अग्रवाल फूड्स’ या हॉटेलमध्ये हा हल्ला घडला. या हल्ल्यामागे इंदापूर तालुक्यातील देवा कोकाटे याचे नाव पुढे आले असून, त्याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी लाकडी दांडके आणि कोयत्यांसारख्या हत्यारांनी हल्ला चढवला. या झटापटीत अग्रवाल यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागला असून त्यांना तात्काळ करमाळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांची संख्या सात ते आठ इतकी होती.

या हल्ल्याची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी करमाळा शहरात दोन गटांत झालेल्या वादाशी संबंधित आहे. सदर वाद मिटवण्यासाठी अग्रवाल आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. परंतु याच कारणामुळे राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला झाला, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे

हल्ल्यावेळी परिसरातील नागरिक व अग्रवाल समर्थक घटनास्थळी जमले. आरोपींनी त्या गर्दीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत देवानंद ऊर्फ देवा कोकाटे (रा. सराटी, ता. इंदापूर) व त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या घटनेनंतर करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. स्थानिक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.

सदर घटनेनंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी अग्रवाल यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
हल्ला करतानाचे सीसीटीव्ही फुटेज: https://youtu.be/Q25CcM1HO7w?si=xY6NxVhcB4iOnGBw



