तोफांच्या सलामीने केममध्ये संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत

केम(संजय जाधव): पंढरपूरहून त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे केम येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी तोफांची सलामी देण्यात आली, तर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत पालखीचे आगमन साजरे करण्यात आले.

सायंकाळी पाच वाजता पालखी पारखे वस्ती येथे दाखल झाली. याठिकाणी जोरदार स्वागतानंतर पालखीने श्रीराम मंदिराकडे प्रस्थान केले. या वेळी केम येथील परिटबंधूंनी—महेश, महादेव, शंकर, सोमनाथ, केशव ससाने—पायघड्या घालून आपल्या परंपरेनुसार पालखीचे स्वागत केले.

गावात प्रवेश करताच चौकात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. श्रीराम बोंगाळे यांनी वारकऱ्यांना बिसलेरीच्या बाटल्यांचे वाटप केले. समाजमंदिर येथे आल्यानंतर जेसीबीद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर पालखी श्रीराम मंदिरात दाखल झाली. नाथांची आरती झाली आणि झेंडकऱ्यांनी झेंडे खाली ठेवले.

सायंकाळी ७ ते ८ या वेळेत कीर्तनसेवा पार पडली, तर रात्री ८ वाजता ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी औषध, गोळ्या वाटून वारकऱ्यांची सेवा केली.


पोलीस उपनिरीक्षक गुटाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त उत्तम ठेवण्यात आला होता. पहाटेपासून ग्रामस्थांनी पूजा-अर्चा करून वातावरण भक्तिमय केले होते. सकाळी ७ वाजता नित्यनेमाप्रमाणे संजय देवकर, नाना देवकर, कुंडलिक तळेकर, अरुण ससाने, लक्ष्मण बिचितकर यांच्या वतीने वारकऱ्यांना धपाटी वाटप करण्यात आले. “धपाटी” ही वारकऱ्यांची आवडती पारंपरिक खाद्यपदार्थ असल्याने ही प्रथा आजही जपली जाते.

बाबा व मोरे यांनी अल्पोपहार देत वारकऱ्यांचे स्वागत केले. सकाळी साडेसात वाजता पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी प्रस्थान करून निघाला. निरोप देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा भक्तिभाव, सेवाभाव व श्रध्देचे प्रतीक ठरला.


