करमाळा पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित

करमाळा(दि. 14): पोलिसांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणि आजारांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने 13 ऑगस्ट रोजी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रक्त तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपजिल्हा रुग्णालय, करमाळा यांच्या माध्यमातून हे शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात सर्व पोलिसांची सीबीसी, एलएफटी/केएफटी, एचबीए1सी, एचआयव्ही, व्हीडीआरएल आणि टीएफटी या रक्त तपासण्या करण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी या शिबिराबाबत माहिती देताना सांगितले की, पोलिसांना 24 तास जनतेची सेवा बजावावी लागते. कर्तव्यावर असताना वेळेवर जेवण, पाणी, झोप व आराम मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी बीपी, शुगरसह इतर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे याची योग्य वेळी तपासणी व्हावी व होणारा धोका टाळता यावा यासाठी हे शिबीर घेण्यात आले.

हे शिबिर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमोद खोबरे, समुपदेशक कपिल भालेराव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्ञानेश्वरी पाटील, एलडब्ल्यूएस लिंक वर्कर अनिता जगताप यांनी सहकार्य केले.



