रात्रीच्या गस्ती दरम्यान पोलिसांची मोठी कारवाई : करमाळा-पांडे रस्त्यावर 14 जर्सी गाईंसह टेम्पो जप्त

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.९: करमाळा पोलिसांच्या दक्षतेमुळे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 14 जर्सी गाईंची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई 5 नोव्हेंबर ला पहाटे साडेतीनच्या सुमारास करमाळा–पांडे रस्त्यावर देवीचा माळ परिसरात करण्यात आली.

डीबी शाखेतील पोलीस नाईक हनुमंत गोरख भराटे यांनी फिर्याद दिली. त्यात त्यानी म्हटले की,मी, पोसई ढोरे व चालक पोकाँ पवार हे डायल 112 या वाहनातून नियमित रात्रगस्त करत असताना, संशयास्पद टेम्पो दिसल्याने आम्ही पाठलाग करून तो थांबवला. तपासणीदरम्यान टाटा कंपनीचा 1212 मॉडेलचा तपकिरी रंगाचा टेम्पो (क्र. MH-42-BF-4990) वाहनामध्ये ताडपत्री टाकून काहीतरी लपविल्याचा संशय आल्याने, पंचांच्या उपस्थितीत पाहणी केली असता, एकूण 14 जर्सी गाई दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्या.

टेम्पोतील चालकाने आपले नाव जगनाथ पंढरीनाथ साळवे (वय 32, रा. आंबेडकरनगर, राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) तर सोबतीचा इसम मुजाहिद बफूर कुरेशी (वय 22, रा. आंबेडकरनगर, राशीन) असल्याचे सांगितले. विचारणा केल्यावर त्यांनी या गाई भुम येथे कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले.

चौकशीअंती टेम्पोतील जनावरे या बबलु माजिद कुरेशी (रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याच्या मालकीच्या असल्याचे चालकाने सांगितले. गाईना अत्यंत निर्दयतेने, चारा-पाणी व औषधाविना कोंबून वाहतूक केली जात असल्याने प्राण्यांवरील क्रौर्य कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. करमाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

