घरासमोर लॉक केलेली मोटारसायकल रात्रीत गायब – गावातील सीसीटीव्हीत संशयिताचा व्हिडिओ

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम गावात अज्ञात चोरट्याने घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरीला नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असून गावात संशयास्पद फिरताना एक अनोळखी व्यक्ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. (याची व्हिडीओ बातमीच्या शेवट दिली आहे)

फिर्यादी ओंकार संजय जाधव (वय 21, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दाजी हणुमंत पांडुरंग भोसले (रा. बाबळगाव, ता. इंदापूर) यांची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. MH-42 AU-4389) आपल्या घरासमोर लॉक करून ठेवली होती.

मात्र पहाटे चार वाजता मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. जाधव व त्यांच्या नातेवाईकांनी गावात सर्वत्र शोध घेतला, पण गाडी मिळाली नाही. अखेर अज्ञात चोरट्यानेच वाहन चोरून नेले असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
चोरीस गेलेली मोटारसायकल काळ्या रंगाची असून तिची अंदाजे किंमत 30 हजार रुपये आहे. पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर व त्यांची टीम करत आहे.

सीसीटीव्ही मध्ये व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली
यासंदर्भात ग्रामस्थांनी गावातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री अडीचच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती विना मास्क घालून हातात बाटली घेऊन एका घरासमोर संशयास्पद हालचाली करताना दिसली. घरातील लोक झोपलेले आहेत का याची खात्री करत असल्याचेही फुटेजमध्ये दिसून आले. ही व्यक्ती गावातील नसल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.


सदर चोरीनंतर केम परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याआधीही गावात अनेक मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत, मात्र त्यांचा तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवून अशा भुरट्या चोरांना चाप बसवावा तसेच चोरीला गेलेल्या गाड्या शोधून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.


