मकाई ऊसबिला संदर्भात आंदोलनकर्ते व जिल्हाधिकारी यांची बैठक संपन्न – बिलासाठी दिली नवीन मुदत

केम (संजय जाधव)- श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून आंदोलनकर्ते व कारखाना प्रशासन यांची काल(दि.८) शुक्रवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मकाई कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना २५ डिसेंबर पर्यंत बिलाची रक्कम देईल असे सांगितले.

या बैठकीला करमाळ्याचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, प्रा. रामदास झोळ, पंचायत समितीचे माजी सदस्य अ‍ॅड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, बहुजन संघर्ष सेना अध्यक्ष राजाभाऊ कदम आदी आंदोलन कर्ते उपस्थित होते.

सत्ताधारी बागल गटाचे कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल व कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे हे उपस्थित नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला असून येत्या सोमवारी त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. आंदोलकांची बैठक झाल्यानंतर आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, कारखान्याचे श्री. बनसोडे, कारखान्याचे अध्यक्ष भांडवलकर, नवनाथ बागल यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 25 डिसेंबर 2023 पर्यंत बिले मिळतील, असे सांगितले आहे. त्यामुळे तोपर्यंत करमाळा तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले थू थू आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था

२५ डिसेंबर पर्यंत मकाई कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना बिलाची रक्कम देतील असे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली असून जर कारखाना प्रशासनाने सदर बिलाची रक्कम दिली नाही तर कारखान्याच्या मालमत्तेवरती बोजा चढविणार असणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. खाजगी प्रॉपर्टी वरती बोजा चढवण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे मी बोजा चढवला तरी कोर्ट मान्य करणार नाही.

राजाभाऊ कदम, अध्यक्ष, बहुजन संघर्ष सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!