नवीन मूत्राशय बसवून मूत्राशयाचा कर्करोग झालेला रुग्ण झाला बरा
करमाळा : मूत्राशयाचा कर्करोग झालेल्या रुग्णाला नवीन मूत्राशय तयार करून बसवता येतो व त्यातून रुग्ण बरा देखील होत असल्याची माहिती डॉ.संजय कॉग्रेकर यांनी दिली. डॉ. कॉग्रेकर हे मूळचे करमाळ्याचे असून सध्या ते सांगली येथील उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आमच्या हॉस्पिटलमध्ये फिजी या देशातील मूत्राशयाचा कर्करोग झालेल्या एका रुग्णावर मूत्राशय बदलाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे पार पडली. मूत्राशयाच्या कर्करोगाचे तज्ज्ञ डॉ. मकरंद खोचीकर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून या रुग्णाला नवसंजीवनी दिली आहे.
फिजीमधील इमॅन्युअल प्रसाद हे ५० वर्षीय शिक्षक मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. फिजी येथे त्यांच्यावर प्राथमिक निदान करून तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही ते बरे झाले नाहीत. त्यांना झालेला मूत्राशयाचा कर्करोग हा ‘मसल इन्व्हेजीव’ म्हणजे शरीरामध्ये पसरणारा असल्याने ते मूत्राशय काढून नवीन मूत्राशय बनवण्याची गरज होती. यासाठी न्यूझीलंडमधील डॉ. कोया यांनी त्यांना ‘उषःकाल’ मधील यूरोलॉजिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांचा संदर्भ दिला. श्री. प्रसाद यांनी डॉ. खोचीकर यांनी केलेले संशोधन, त्यांनी लिहिलेले
प्रबंध यांची माहिती घेतली. डॉ. खोचीकर यांनी आतापर्यंत ६५० हून अधिक मूत्राशय बदलाच्या शस्त्रक्रिया
केल्या आहेत, याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी ‘उष:काल’ मध्ये उपचारांसाठी येण्याचा निर्णय घेतला. दोन आठवड्यापूर्वी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. यासाठी सहा तास लागले. श्री. प्रसाद यांच्या लहान आतड्यापासून नवीन मूत्राशय बनविले असून ते उत्तम काम करत आहे.