दुकानासमोरील अतिक्रमणाला कंटाळुन दुकानदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील गांधी चौकात दुकानासमोर स्टॉल लावून फळे, भाजीपाला आदी वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या अतिक्रमणाला वैतागून येथील एका दुकानदाराने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने हा अनर्थ टळला. २१ सप्टेंबर रोजी केम येथील गांधी चौकात ही घटना घडली.
सचिन ओस्तवाल असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव असून गांधी चौकातील रस्त्याच्या कडेला त्यांचे लेडिज शाॅपीचे दुकान आहे. गांधी चौकात रस्त्याच्या कडेला फळे, भाजीपाला विक्रेते हे विक्रीसाठी बसतात. तसेच गौरी-गणपतीचा सण असल्याने चौकात मिठाईची दुकाने लावली जात आहेत. सणाच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. ओस्तवाल यांच्या दुकानासमोरदेखील अनेक विक्रेते विक्रीसाठी बसलेले असतात. यामुळे त्यांचे दुकान पाठीमागे राहत असल्याने ग्राहकांना दिसत नाही. .
या कारणावरून सचिन ओस्तवाल यांची अनेकवेळा या विक्रेत्यांशी बाचाबाची झालेली आहे. अशाच एका बाचाबाची नंतर (दि २१ सप्टेंबर) ओस्तवाल यांनी आपल्या दुकानासमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु चौकातील थांबलेल्या लोकांच्या लक्षात आले वेळीच त्यांनी दुकानदाराला रोखले ही बातमी केम पोलिस चौकीला समजताच पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकातील विनाकारण थांबलेल्या लोकांना बाजूला केले. तसेच चौकातील लावलेल्या गाडया तसेच फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांना बाजूला हटविले. ओस्तवाल यांची बाजू त्यांनी ऐकून घेतली. या घटनेनंतर केम गावात व परिसरात हा चर्चेचा विषय झाला असून या अतिक्रमनाविरोधात ग्रामपंचायतीने काही ठोस पावले उचलली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
माझा या दुकानावर उदरनिर्वाह असून या दुकानासाठी मी कर्ज काढलेले आहे. माझ्या दुकानासमोर फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते विनाकारण गाडया लावतात. यामुळे माझे दुकान चौकात असून दिसत नाही. याचा माझ्या विक्रीवर परिणाम होतो. हे अतिक्रमण हटवा या मागणीसाठी मी जिल्हाधिकारी, करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी, केम ग्रामपंचायत यांना लेखी निवेदन दिले होते. माझी कुणाकडूनच दखल घेतली जात नसल्याने व सणाला देखील माझी पुरेशी विक्री झाली नसल्याने मी वैतागलो होतो. कंटाळून मी आत्म दहनाचे पाऊल उचलले. आतातरी मला व इतर दुकानदारांना न्याय मिळवून द्यावा.
– सचिन ओस्तवाल, दुकानदार, केम
दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने ठराव करून मंडई श्री ऊत्तरेश्वर मंदिर पटांगणात नेली. परंतू ग्रामपंचायतींच्या ढिसाळ कारभारामुळे भाजी विक्रेते,फळ, विक्रेते परत चौकात येऊन बसतात अगोदरच चौकात अपुरी जागा आहे मंडई मुळे चौकात गर्दी होते व विनाकारण चौकात गाडया लावून लोक थांबतात कालच्या घटनेला केम ग्रामपंचायत जबाबदार आहे.
– अच्युत पाटील, एपी ग्रुप अध्यक्ष, केम
येत्या आठ दिवसांत चौकातील व्यापारी यांच्याशी चर्चा करून भाजी मंडई इतरत्र हालवली जाईल या साठी व्यापारी नागरिकांनी सहकार्य करावे
– अजित तळेकर, माजी सरपंच, केम