विशाळगड परिसरात हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी – मुस्लिम समाजाच्यावतीने निवेदन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड-गजापुर परिसरातील धार्मिक स्थळांवर, मुस्लिम कुटुंबावर, त्यांच्या मालमत्तेवर केलेल्या हल्ल्याची चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी काल (दि.२) करमाळा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये मंडलाधिकारी सत्यवान घुगे व पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी, मौलाना मोहसीन शेख, मौलाना अन्वर शेख यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशालगड गाजापुर येथे दि.१४ जुलै रोजी अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून काही गरीब अल्पसंख्यांक समाजातील नागरिकावर हल्ला करून त्यांची दुकाने ,घरे, चार चाकी वाहने, दुचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली तर धार्मिक स्थळांची ही तोडफोड करण्यात आली याबाबत मुख्यमंत्री यांनी त्वरित या प्रकरणा बाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी नगरसेवक फारुक जमादार, फिरोज बेग,इंदाज वस्ताद,मजहर नालबंद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, सोहेल पठाण वस्ताद समीर दाऊद शेख, तौफिक शेख,मतीन बागवान समद दाळवाले,मुस्तकिन पठाण, जावेद आतार, ,असीम बेग शाहरूख शेख ,बंडू शेख,समीर सिकंदर शेख,मुख्तार पठाण, इमरान घोडके, इस्राईल कुरेशी, सरफराज पठाण, ईन्नुस पठाण,मुकबीर कुरेशी,उमर मदारी ,अमन बागवान साबीर तांबोळी वाजीद शेख राजु तांबोळी आदी जणांच्या निवेदनावर सह्या आहेत.
काय आहे प्रकरण ?
विशाळगडावर सुमारे १५८ अतिक्रमणे आहेत. यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयीन वाद असलेली अतिक्रमणे सोडून अन्य अतिक्रमणे काढावीत, यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगडावर जाऊन ही अतिक्रमणे हटविण्याचा इशारा दिला होता. १४ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी विशाळगडावर छत्रपती संभाजीराजे व कार्यकर्त्यांनी जाण्याचे ठरविले. विशाळगडासह पायथ्याला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संभाजीराजे व पोलिस, प्रशासनात चर्चा सुरू असताना विशाळगडाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिस वर सोडत नसल्याने संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी पायथ्याला लागून असलेल्या गजापुराकडे आपला मोर्चा वळवला. गजापुरातील घरांवर दगडफेक सुरू केली. दारात लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहने उलथून टाकली. त्यांची मोडतोड केली. तेथीलच धार्मिक स्थळांवर त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. यात एका घराला आगही लावण्यात आली, तसेच या परिसरातील लहान स्टॉलधारकांच्या स्टॉलची मोडतोड करून त्यांचे साहित्यही विस्कटून टाकले. या ठिकाणी घरात महिला, लहान मुले, वृद्ध होते. अचानक या घटनेने ते सर्वजण भयभीत झाले. या घटनेमुळे रस्त्यावर विटा, दगडांचा खच पडला होता. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थितीत नियंत्रणाखाली आणली.