सेतू केंद्राने नागरिकांकडून नियमानुसार फी घ्यावी
– तहसीलदार यांना निवेदन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सेतू केंद्राने नागरिकांकडून नियमानुसार फी घ्यावी अशा मागणीचे निवेदन करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष फारूक जमादार यांनी करमाळा तहसीलदार यांना दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा रहिवासी दाखला हे कागदपत्र नागरिकांना सेतू कार्यालय तेथे जाऊन काढावा लागतो परंतु शासकीय सेतू केंद्र व खाजगी सेतू केंद्र हे नियमानुसार फी घेत नसल्याचे समजते त्यामुळे नागरिकांची नाहक आर्थिक लूट होत असल्याचे समजते
याबाबत तहसीलदार यांनी सदर सेतू चालकांना नियमानुसार फी आकारणे तसेच सेतू कार्यालयाच्या बाहेर फी चा दर फलक बोर्ड लावण्याचे आदेश व्हावेत तसेच प्रतिज्ञापत्र स्टॅम्पवर न करता साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र करून मिळावे आणि याबाबत नागरिकांना माहिती पडण्या कामी सेतू कार्यालयाच्या बाहेर माहिती फलक लावण्याचे आदेश व्हावेत तसेच सेतू चालकांची बैठक घेऊन त्यांना नियमानुसार फी घेऊन त्याची पावती संबंधिताना देण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष फारूक जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.