रस्त्यावर मध्यभागी उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक- पिता-पुत्र गंभीर जखमी

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१९ : सालसे मार्गावरील जुन्या एम.एस.ई.बी.सब-स्टेशनसमोर रस्त्याच्या मध्यभागी कोणतेही संकेत, लाईट किंवा रिफ्लेक्टर न लावता उभी केलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ डिसेंबर ला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

या अपघातात अजिनाथ अंबादास पाटील (वय ६५) व त्यांचा मुलगा विशाल अजिनाथ पाटील (वय ३७, रा. सालसे, ता. करमाळा) हे जखमी झाले आहेत. विशाल पाटील हे त्यांची सीडी डिलक्स (क्र. एम.एच. ४५ ए.ए. ०२८३) दुचाकी चालवत शेतावरील वस्तीवर जात असताना हा अपघात झाला.

समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या उजेडामुळे रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली दिसली नाही. संबंधित लाल रंगाचा स्वराज ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २५ ए.एल. ५९५१) व त्यास जोडलेली उसाची ट्रॉली रस्त्याच्या मध्यभागी धोकादायकरीत्या उभी करण्यात आली होती. ट्रॉलीच्या पाठीमागे कोणतेही रिफ्लेक्टर किंवा चेतावणी दिवे लावलेले नसल्याने दुचाकी थेट ट्रॉलीला धडकली.

या अपघातात विशाल पाटील यांच्या तोंडाला, अंगाला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून अजिनाथ पाटील यांच्या डोक्यासह अंगावर व पायाला जबर मार लागला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून दोघांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अजिनाथ पाटील यांना दि. १४ डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला असून विशाल पाटील यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

