करमाळा तालुक्यातील तलाव कामातील कथित भ्रष्टाचाराविरोधात ‘प्रहार’चे मुंबईत अनोखे आंदोलन

केम(संजय जाधव): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, पोथरे, कोर्टी व अर्जुननगर येथील रूपांतरित साठवण पाझर तलावाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘पोतराज’ वेशभूषा परिधान करून ‘जागरण गोंधळ’ घालत शासनाचे लक्ष वेधून घेतले.

या आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र भूमिका घेत एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये मुख्य अभियंता नितीन दुसाने, अधीक्षक अभियंता चेतन कलशेट्टी, दक्षता गुण नियंत्रण पथकातील सुहास गायकवाड तसेच जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल शिरसागर यांच्यावर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
तलावाचे काम करणाऱ्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांनी प्रशासनाची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली.

“शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी असलेल्या तलावांच्या कामात भ्रष्टाचार करणे हा गंभीर गुन्हा आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने जनतेचा पैसा लाटला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील,” असे अजित कुलकर्णी यांनी सांगितले.
आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात बॅनरबाजी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. या आंदोलनात अब्बास आली यादगीर, मुजाहिद सय्यद, प्रवीण चव्हाण, प्रताप तळेकर, सोमनाथ देवकर, मच्छिंद्र कोकाटे, रवींद्र मोरे, वैभव कोकाटे यांच्यासह करमाळा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

